इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) गावचे माजी सरपंच, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आणि प्रतीक उद्योग समूहाचे प्रमुख, उद्योगपती आनंदराव दत्तू पाटील (वय ५९) यांचे साेमवारी भरधाव मोटारीची धडक बसल्याने निधन झाले. ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय होते. हा अपघात दुपारी १२.३० च्या सुमारास झाला. या घटनेने रेठरेधरण गाव शोकसागरात बुडाले होते.
याबाबत अरविंद भगवान कुऱ्हाडे (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात मोटार चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरून शामराव आनंदराव जगताप (रा. शास्त्रीनगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांनी जगताप याला ताब्यात घेतले आहे.
येथील कोल्हापूर रस्त्यावर आनंदराव पाटील यांचा पेट्रोलपंप आहे. पंपासमोर त्यांचे निवासस्थान आहे. सकाळी ते पंपावर आले होते. तेथील कामकाज आटोपून दुपारी १२.३० च्या सुमारास ते चालत घराकडे निघाले होते. रस्ता ओलांडत असताना शामराव जगताप हा मोटार (क्र. एमएच १३ एझेड ११३५) चालवत वाघवाडीच्या दिशेने इस्लामपूरकडे भरधाव वेगात येत होता. त्याच्या मोटारीची धडक आनंदराव पाटील यांना बसली.
या धडकेत पाटील हे उडून डांबरी रस्त्यावर पडले. डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जगताप हा न थांबता सुसाट वेगाने वाघवाडीच्या दिशेने मोटारीसह पळून जात होता. त्यावेळी कुऱ्हाडे आणि वाहतूक पोलिसांनी थरारक पाठलाग करत त्याला वाघवाडी फाट्यावर ताब्यात घेतले.
आनंदराव पाटील हे गेल्या ३० वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय होते. उद्यमशील व्यक्तिमत्त्व आणि सर्वांना मदतीचा हात देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. सायंकाळी रेठरेधरण या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासह मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी होते.
आनंदराव पाटील हे २००० पासून गेली २१ वर्षे राजारामबापू कारखान्याचे संचालक होते. त्यांनी रेठरेधरणचे सरपंचपदही भूषविले आहे. त्यांच्या पत्नी संध्याताई पाटील या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते माजी सभापती जनार्दनकाका पाटील यांचे मेहुणे, उद्योजक दादासाहेब पाटील यांचे ज्येष्ठ बंधू, सरपंच लतिका पाटील यांचे दीर, महानंदचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांचे साडू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.२८ जुलै २०२१ रोजी सकाळी रेठरेधरण येथे होणार आहे.
फोटो : २६ आनंदराव पाटील