लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या पुणे येथील वार्षिक सभेत प्रदेश संघटनमंत्री म्हणून सांगलीचे अमित मराठे यांची निवड जाहीर करण्यात आली.
पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी उस्ताद उस्मान खाँ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात सांगली व मिरजेतील प्रांत कार्यकारिणी निवडण्यात आली. अमित मराठे यांची संघटनमंत्रीपदी, सुहास दिवेकर यांची संगीत विधा संयोजकपदी, मिलिंद महाबळ यांची चित्र शिल्पकला सहसंयोजकपदी व विसूभाऊ कुलकर्णी यांची सांगली जिल्हा संयोजक म्हणून निवड करण्यात आली.
नृसिंहवाडी हे क्षेत्रही सांगलीला लागून असल्यामुळे तेथील कामकाजही सांगली महानगर समिती करणार आहे. मिरज महानगर ही एक वेगळी समिती नियुक्त करण्यात आली. सांगली महानगर अध्यक्षपदी माधव वैशंपायन, सचिवपदी कविता कुलकर्णी, कोषप्रमुखपदी संतोष बापट, मिरज महानगर समितीच्या अध्यक्षपदी राजश्री शिखरे, सचिवपदी श्रीधर देसाई तर कोषप्रमुखपदी मिलिंद शिराळकर यांची निवड करण्यात आली.