सांगली : शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातील आदित्य डायग्नोस्टिक सेंटरमधील पीपीई किटसह मेडिकल वेस्ट महापालिकेच्या कचराकुंडीत टाकल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला. या वेळी बायोमेडिकल वेस्ट टाकण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकांवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली. हा प्रकार समजताच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या डायग्नोस्टिक सेंटरला महापालिकेच्या वतीने एक लाखाचा दंड करण्यात आला असून पोलीस व आरोग्य विभागाकडून पंचनाम्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सिव्हिल हॉस्पिटलसमोरील आदित्य डायग्नोस्टिक सेंटरची रुग्णवाहिका (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ४६०१) पीपीई किट व इतर बायोमेडिकल कचरा गणेशनगर रोटरी हाॅलच्या पिछाडीस असलेल्या महापालिकेच्या कचराकुंडीत टाकण्यासाठी आली होती. चालक प्रकाश अवघडे हे कचरा टाकत असताना स्थानिक नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी कचराकुंडीत बायोमेडिकल वेस्ट टाकण्यास विरोध करीत रुग्णवाहिका रोखून धरली. कचरा टाकण्याबाबत नागरिकांनी चालकाला जाब विचारला. त्याने उद्धट उत्तर दिल्याने नागरिकांचा संताप वाढला. काही जणांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. यात रुग्णवाहिकेच्या काचा फुटल्या.
नगरसेवक फिरोज पठाण, बिरेंद्र थोरात यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. महापौर सूर्यवंशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोग्य निरीक्षक अंजली कुदळे व पथकालाही बोलावून घेण्यात आले. या वेळी कचराकुंडीत पीपीई किट व इतर साहित्य टाकण्यात आले होते. तसेच रुग्णवाहिकेतही मेडिकल कचरा होता. महापौर सूर्यवंशी यांनी डायग्नोस्टिक सेंटरला एक लाख रुपयांचा दंड केला. आरोग्य विभागाने हा दंडही सेंटरकडून वसूल केला. दरम्यान, पोलीस व महापालिकेकडून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
चौकट
परवाना रद्दसाठी प्रयत्न : महापौर
आदित्य डायग्नोस्टिक सेंटरकडून वापरलेले मेडिकल वेस्ट कचरा कंटेनरमध्ये टाकला जात आहे. याबद्दल एक लाखाचा दंड ठोठावला आहे. शिवाय सोमवारी आदित्यचा परवाना रद्द करण्याबाबत आयुक्त कापडणीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
चौकट
नोटीस बजावणार : आयुक्त कापडणीस
दवाखाना किंवा डायग्नोस्टिक सेंटरमधील कचरा हा सूर्या एजन्सीकडे द्यायचा असताना आदित्य डायग्नोस्टिककडून तो महापालिकेच्या कचराकुंडीमध्ये टाकण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे संबंधित डायग्नोस्टिक सेंटरला नोटीस बजावणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.