सांगली : राज्य शासनाने अनलॉक घेतलेल्या निर्णयानुसार उद्या, रविवारपासून जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सर्व दुकाने, हॉटेल्स, मॉल्स, शॉपिंग सेंटर रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय खुल्या जागेवरील अथवा लॉनवरील विवाह सोहळ्यास २०० लोकांना परवानगी असणार आहे. दरम्यान, सिनेमागृहे, नाट्यगृहे, धार्मिकस्थळे मात्र बंदच राहणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी निर्बंध शिथिलतेबाबतचे आदेश दिले. त्यानुसार सर्व दुकाने व सेवांची वेळ वाढविण्यात आली आहे. राज्य शासनानेच याबाबतचा आदेश दिला होता.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही सरासरी सहाशेवर असल्याने निर्बंधाच्या निर्णयाबाबत उत्सुकता होती. मात्र, राज्य शासनाने आदेश जारी करताना, सर्व दुकानांना आता रात्री दहापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स, उपहारगृहे व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही आता दहापर्यंत व्यवसाय करता येणार आहे.
जिल्ह्यातील हॉटेल्स, बार रात्री दहापर्यंत सुरू राहतील, तर २४ तास पार्सल सेवा दिली जाऊ शकते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत व हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची पुरेशी काळजी घेत हाॅटेल्सना परवानगी देण्यात आली आहे.
शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, सलून, स्पा इत्यादींना वेळ वाढवून देण्यात आली असली तरी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
खुल्या जागेवर अथवा लॉनवर होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा २०० लोकांची करण्यात आली असून बंदिस्त हॉलमध्ये १०० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा करण्यास परवानगी असेल. मंगल कार्यालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
चाैकट
हे बंदच राहणार
शासनाने सर्व दुकानांना रात्री १० पर्यंत वेळ दिली असली, तरी नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे मात्र, बंदच राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे सर्व बंद राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.