लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापूर ओसरून आता दोन महिने झाले, तरी शासनाकडून पूरग्रस्तांना अनुदान मिळालेले नाही. शासनाच्या या दप्तरदिरंगाईचा व धोरणाचा निषेध करीत सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी गणपती मंदिरासमोर घंटानाद करण्यात आला.
गणपती मंदिरासमोर सकाळी साडेअकरा वाजता सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा महापूर येऊन दीड ते दोन महिने होत आले आहेत. काही तुरळक पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळाले आहे. बहुतांश पूरग्रस्तांना अजूनही सानुग्रह अनुदान व धान्य मिळालेले नाही. व्यापारी व शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. पंचनाम्यावर मदत अवलंबून असताना अद्याप काही पूरग्रस्तांचे पंचनामे झालेले नाहीत.
निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले की, राज्य सरकारला जागे करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सांगलीच्या गणरायाला साकडे घातले आहे. मदतीबाबतचा गोंधळ कायम आहे. शासनाने कोणाला व कशापद्धतीने मदत केली, याचा कोणालाही थांगपत्ता लागलेला नाही. अनंत चतुर्दशीपर्यंत तत्काळ मदत शासनाने दिली पाहिजे.
माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, विकास मगदूम, उमेश देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी, इम्रान शेख, वसीम शिकलगार, संजय चव्हाण, अभिमन्यू भोसले, तुळशीराम गळवे, अविनाश गाडेकर, रेखाताई पाटील, प्रल्हाद व्हनमाने, म्हाळाप्पा पटाफ उपस्थित होते.