कडेगाव : पलूस-कडेगाव मतदारसंघात झालेली प्रचंड विकासकामे आणि दुष्काळी भागात फुलवलेले नंदनवन आज मी प्रत्यक्षात पाहिले. येथील जनता डॉ. पतंगराव कदम यांना दैवत का मानते, याची अनुभूती आली. या मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या यशामागे येथे झालेल्या विकासकामांची किमया आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाचा प्रभाव असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
येतगाव (ता. कडेगाव) येथे कडेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येतगाव, ढाणेवाडी व कोतिज येथील नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते जितेश कदम उपस्थित होते.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कोरोना काळात अपेक्षित विकासकामांचा वेग साधता आला नाही. मात्र, आता नक्कीच विकासकामे वेगात करणार आहे. ताकारी व टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असलेल्या ढाणेवाडीचा पाणीप्रश्न सोडविण्याची जबाबदारी माझी आहे.
येतगावचे माजी उपसरपंच अर्जुन कणसे, अँड. नीलेश सुतार, संग्राम कणसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेश मोहिते, इंद्रजित साळुंखे, महेश कदम, अर्जुन कणसे, सुनील पाटील, हिम्मत देशमुख, समाधान घाडगे आदी उपस्थित होते. अँड. किरण उथळे यांनी स्वागत केले तर आकाश सरगर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र जरग यांनी आभार मानले.
चौकट :
तिन्ही गावांना भरघोस निधी
येतगाव येथे ५० लाख, ढाणेवाडीसाठी २८ लाख; तर कोतिजसाठी १८ लाखांचा निधी आमदार फंडातून तसेच शासनाच्या विविध योजनांतून मंजूर केला असल्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
फोटो ओळ : येतगाव (ता. कडेगाव) येथे नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सत्कार केला. यावेळी शांताराम कदम, डॉ. जितेश कदम उपस्थित होते.