कोकरुड : शिराळा तालुक्यातील शेतीचे, पिकांचे मोठे नुकसान झाले असून बुधवार २८ पासून तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांमार्फत पंचनाम्यांना सुरुवात केली जाणार आहे. तीन दिवसात पंचनाम्यांचा अहवाल शासनाला द्यावा लागणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
शिराळा तालुक्यात चार दिवस पडलेल्या पावसाने नदीकाठी असणारी पुराची शेती, वरची शिवारातील आणि डोंगराकडील अशा सर्व प्रकारच्या शेतीचे बांध फुटून, माती वाहून, तसेच खरीप हंगामातील मका, भात, भुईमूग, ऊस, सोयाबीन आदी पिके मोडून, वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचे ८० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने २८ ते ३१ जुलै या चार दिवसात तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत पंचनामे करण्यात येणार आहेत. तलाठी, ग्रामसेवकांनी घराचे पंचनामे पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांनी पंचनाम्यांच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.