तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यातील तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांच्या उसाचे बिल तातडीने मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी येथे चिंचणी नाक्यात रास्ता रोको आंदोलन आणि खासदार पाटील यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तासगाव कारखान्याने अनेक शेतकऱ्यांची बिले थकवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तासगाव तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यांनी सोमवारी तासगाव येथील चिंचणी नाक्यात रास्ता रोको केला. त्यानंतर खासदार पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दोन दिवसात ऊस बिल न दिल्यास चाचणीत त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खराडे यांनी दिला.
खराडे म्हणाले, भाजपच्या खासदारांनी ऊस उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले आहे. कारखान्यांना उसाचा पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांत बिले देणे बंधनकारक आहे. मात्र शेतकऱ्यांना तासगाव कारखान्याने या हंगामात लोकांना पैसे दिले नाहीत. कारखान्याकडून ऊस बिले देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. खासदार पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी कारखान्याने शेतकऱ्यांना पिळायचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. या कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील अनेक शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत. शेतकरी कारखाना स्थळावर हेलपाटे मारत आहेत. तेथे गेटवरून आत सोडले जात नाही. प्रशासनाचे लोक भेटत नाहीत. पेरण्या तसेच पोरींची लग्ने कशी करायची, या चिंतेत लोक आहेत.