मिरज : दसरा, दिवाळीनंतर फुलांची मागणी कमी झाल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक घटली आहे. मागणी नसल्याने फुलांचे दर पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. झेंडू, गलांडा, निशिगंध या फुलांचे दर केवळ १० ते २५ रूपयांवर आल्याने फूल उत्पादक शेतकरी लग्नसराई हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हंगामात फुलांना मागणी असल्याने निशिगंध, झेंडू, गलांडा, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांची आवक मिरजेतील फुलांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात होती. दसरा, दिवाळीत झेंडूचे दर ८० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचले होते. झेंडूशिवाय गलांडा, निशिगंध, गुलाब, डच गुलाब, जरबेरा व ग्लॅडोच्या फुलांना चांगला दर मिळाला. स्थानिक विक्रीसह मिरजेतून कर्नाटक व गोवा राज्यांसह इतर ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू होती. फुलांचे दर पडल्याने व्यापारी व फूल उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. झेंडू व गलांडा या फुलांना केवळ १० ते २० रूपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने वाहतूक खर्च परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मिरजेत दररोज सकाळी भरणाऱ्या फुलांच्या बाजारात फुलांची आवक व खरेदी-विक्रीची उलाढाल घटली आहे. फुले स्वस्त झाल्याने हारांचे दरही कमी आहेत. (वार्ताहर)
सणानंतर फुलांनी उत्पादकांना रडविले
By admin | Updated: November 30, 2015 01:14 IST