इस्लामपूर : सहकारी संस्थेत राजकारण नको, ही आमची भूमिका पहिल्यापासूनच आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकारात काम करणे गरजेचे आहे. सत्ता नसल्यामुळे ज्यांनी विविध संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती केल्याची विधाने केली, त्यांच्यावर काही बोलणार नाही. जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. त्यांच्या पराभवानंतर पुन्हा त्यांना बरोबर घ्यावे लागणार आहे, असा रेशीम चिमटा काढत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी माजी मंत्री पतंगराव कदम यांना डिवचले.जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील शेतकरी सहकारी पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ गुरुवारी येथे झाला. यावेळी खा. संजयकाका पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, विलासराव शिंदे, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, दिलीपराव पाटील, सुरेश पाटील, बी. के. पाटील, सिकंदर जमादार उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात बँक नफ्यात आणणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता अल्पभूधारक, मागासवर्गीय, दुष्काळग्रस्तांसह जिल्हा बँकेशी संबंध येणाऱ्या प्रत्येक घटकासाठी ताकदीने काम करण्याचा निर्णय या सर्वपक्षीय समविचारी पॅनेलच्या नेत्यांनी केला आहे. चुकीच्या गोष्टींना संरक्षण देणार नाही. मात्र चांगले व बरोबर आहे, त्याला पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या मंडळीनी चौकशा लावल्या, प्रशासक नेमले त्यांच्याकडून आरोप होतील, त्याला उत्तर देण्याची गरज नाही.ते म्हणाले, जिल्हा बँकेसारखी शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा देणारी लोकनियुक्त संस्था आणखी सक्षम केली जाईल. दुष्काळी भागाला अधिक मदत करताना शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवून चार पैसे जास्त मिळतील, असा प्रयत्न आहे. वाळवा, मिरज तालुक्यातून अधिक पाठबळ देत हे पॅनेल किमान १७०० मते घेईल.माणिकराव पाटील म्हणाले की, सहकारी बॅँकिंग क्षेत्रात सामाजिक आशय, अपेक्षांचे भान ठेवताना नियमांची पायमल्ली होणार नाही, हे पहायला हवे.विलासराव शिंदे यांनी प्रास्ताविक करुन उमेदवारांची ओळख करुन दिली. राहुल पवार यांनी आभार मानले. यावेळी मनोज शिंदे, सभापती रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील, नेताजीराव पाटील, विष्णू माने, चंद्रकांत हाके, बाळासाहेब होनमोरे, कमल पाटील, श्रध्दा चरापले यांच्यासह शेतकरी सहकारी पॅनेलचे उमेदवार, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)त्यांनी काय बोलावे, हे आम्ही कोण ठरवणार? : जयंत पाटीलसर्वपक्षीय पॅनेल करताना काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली होती. आदल्या रात्रीपर्यंत मोहनराव कदम चर्चेत होते. त्यांनी जेवढ्या जागा मागितल्या, त्या देणे शक्य नव्हते. कदम यांनी खा. पाटील यांच्याशीही चर्चा केली होती. शेवटी मर्यादित जागांमुळे सर्वांचे समाधान करता येणार नव्हते. वेळ संपत आल्याने पॅनेल जाहीर केले. पतंगराव कदम व मोहनराव कदम यांनी काय बोलावे, हे आम्ही ठरवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.खा. संजय पाटील म्हणाले की, त्यांची भाषा दमबाजीची आहे. सांगली जिल्ह्यात दमबाजी चालत नाही. वेळ आल्यावर जे काही होईल, ते त्यांना सोसणार नाही, एवढे लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार अधिक चांगला करण्यासाठी हे पॅनेल झाले आहे. मात्र या पॅनेलमुळे काहींचे मानसिक संतुलन बिघडल्याची तोफ कदम कुटुंबियांचे नाव न घेता डागली. आता फक्त सुरुवात झाली आहे. अजून खूप गोष्टी घडणार आहेत. ज्या दिवशी गहू त्याचदिवशी पोळ्या होतीलच.
पराभवानंतर पुन्हा त्यांना बरोबर घ्यावे लागेल!
By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST