सांगली : महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अॅडव्हान्स आणि पाच पगारी रजांचे पैसे एकत्रित देण्याचे आश्वासन आयुक्त अजिज कारचे यांनी कामगारांना दिले. यासंदर्भात महापालिका कामगार सभेने आयुक्तांशी चर्चा केली होती. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडली आहे. एकीकडे व्यापाऱ्यांनी एलबीटीवर बहिष्कार टाकल्याने या विभागाचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांनी घटले आहे. अन्य महसुली विभागांचीही थकबाकी कोट्यवधीच्या घरात आहे. त्यामुळे विकासकामेही ठप्प झाली आहेत. अशातच कर्मचाऱ्यांचे पगारही थकित रहात आहेत. एक महिना विलंबाने कर्मचाऱ्यांना पगार मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे सध्या हाल सुरू आहेत. यंदाच्या दिवाळीत कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स मिळेल की नाही, अशी शंका उपस्थित होत होती. महापालिका कामगार सभेने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी किमान दहा टक्के बोनस मिळावा आणि दहा हजार रुपये अॅडव्हान्सपोटी द्यावेत, अशा मागणीची नोटीस दिली होती. दिवाळीपूर्वी २0११ ते २0१३ पर्यंतच्या पगारी रजांचेही पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. कामगार सभेच्या प्रतिनिधींशी आयुक्तांनी चर्चा केली. यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारी रजांचे पैसे, दर तीन महिन्याला पाच दिवसांचा पगार याप्रमाणे देण्याचे मान्य केले. तसेच आॅक्टोबर २0१४ च्या पगारात पाच दिवसांच्या पगारी रजांचे पैसे जमा करण्यात येतील, असे स्पष्ट केले. येत्या सोमवारी अॅडव्हान्स कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चर्चेवेळी कामगार सभेचे सचिव अॅड. अजितराव सूर्यवंशी, विजय तांबडे, एकनाथ माळी, पुंडलिक कांबळे, अशोक कांबळे, सूर्यकांत सूर्यवंशी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अॅडव्हान्स
By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST