सांगली : ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत विशेष पंधरवडा राबविला जात आहे. याअंतर्गत दि. २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.
याअंतर्गत दोन टप्प्यांत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यांच्यामार्फत गावाचा कृती आराखडा तयार केला जाईल. गावाची लोकसंख्या, नळधारक व नळजोडणी नसणारे ग्रामस्थ, त्यांना जोडणीसाठी येणारा संभाव्य खर्च, उपलब्ध पाणीस्त्रोत, संभाव्य पाणीपट्टी, विद्यमान पाणीयोजनेचा विस्तार, अशी माहिती संकलित केली जाईल. हा आराखडा १५ ऑगस्टच्या ग्रामसभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव आणि कार्यकारी अभियंता दादासाहेब सोनवणे यांनी केले आहे.