सांगली : जिल्हा पोलीस दलाने गेल्या आठवड्यापासून मटक्यासह बेकायदा दारू विक्रीवर सुरू केलेली कारवाई सुरूच ठेवली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागात पोलीस पथकाने कारवाई करत मुद्देमाल जप्त करत संशयितांना अटक केली आहे. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. .
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पोलिसांनी मटक्यासह बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्डयांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार इस्लामपूर येथील पेठनाक्यावर मटका घेतल्याप्रकरणी सुनील विलास शेळके (वय २६) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून १३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तासगाव येथे मटका घेताना नसीर मम्हुलाल सनदी (वय ५०) याला ताब्यात घेत त्याच्याकडून ११२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. समडोळी येथे बाबा श्रीपती पवार (७०, रा. समडोळी), रफिक मेहबूब शेख (बदाम चौक) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून ५२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
समडोळीत चार हजारांची दारू जप्त करण्यात आली. अक्षय संजय पवार (२५) याच्याविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला, तर इस्लामपूर येथे प्रकाश शामराव नेमिष्टे (कापूसखेड) याच्याकडून २३७० रुपयांची दारू जप्त करत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.