सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी रंगपंचमीदिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दुचाकीवर ट्रीपल सीट फिरून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. ट्रीपल सीट फिरणाऱ्या ७९ जणांकडून १५ हजार ८०० रुपये तर दुचाकीवर जाताना मोबाईलवर बोलणाऱ्या ३४ जणांकडून सहा हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे शहरात कार्यन्वित असलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी रंगपंचमीला हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यासाठी शहरातील सर्व भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत प्रशासनाने कारवाई केली.
सांगली व मिरज शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलीस कार्यरत होते. त्यात दुचाकीवर ट्रीपल सीट फिरणाऱ्या ७९ जणांवर सीसीटिव्हीच्या मदतीने कारवाई करण्यात आली. तर मोबाईलवर बोलणाऱ्या ३५ वाहनधारकांनाही सीसीटिव्हीने अचूक टिपत त्यांना दंड केला.
दरम्यान, शहरातील प्रमुख मार्गावर सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याने आता अधिक प्रभावीपणे त्याव्दारे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
चौकट
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, दुचाकी चालवताना ट्रीपल सीट बसवून चालवू नये, मोबाईलचा वापर करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला आहे.