मिरज : मिरजेत म्हैसाळ रस्त्यावर महामार्गाच्या मुरमाच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल होऊन अपघात होत आहेत. यामुळे वड्डी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी महामार्गावर कार्यरत असणाऱ्या ठेकेदाराचे मुरमाचे डंपर रोखले. पावसाच्या काळात मुरूम वाहतूक बंद ठेवण्याच्या आश्वासनानंतर डंपर सोडण्यात आले.
मिरज ते म्हैसाळ रस्त्यावर एका ढाब्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासचे काम सुरू आहे. येथे मुरूम भरून शेकडो डंपर दररोज ये-जा करीत आहेत. पावसाने चिखल झाला असताना त्यातून ये-जा करणाऱ्या मुरमाच्या डंपरमुळे म्हैसाळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन दुचाकीधारक घसरून पडले.
सोमवारी सकाळी रस्त्यावरील चिखलामुळे अनेक दुचाकींचा अपघात होऊन काहीजण जखमी झाले. डंपरमुळे रस्त्यावर होत असलेल्या चिखलामुळे अपघात होत असल्याने सोमवारी सकाळी वड्डी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर कार्यरत असणाऱ्या ठेकेदाराच्या मुरमाचे डंपर रोखले. माजी सरपंच करीमखान वजीर यांच्यासह ग्रामस्थांनी या रस्त्यावर थांबून दुचाकीस्वारांना सावकाश जाण्याच्या सूचना दिल्या. महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता एस. के. शर्मा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सलिम शेख यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. आ. सुरेश खाडे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी रस्त्यावर पाणी मारून चिखल स्वच्छ करण्याच्या सूचना महापालिकेस दिल्या. पावसाच्या काळात मुरमाच्या डंपरची वाहतूक बंद ठेवण्याचे मान्य केल्यानंतर सुमारे तीन तासानंतर मुररमाचे डंपर सोडण्यात आले.