२) शिराळा येथील बंद असणारे गोरक्षनाथ मंदिर
३) शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचा सुनासुना परिसर.
(छाया : विकास शहा, शिराळा)
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील गोरक्षनाथ यात्रा रद्द करण्यात आली असून, शुक्रवारी मठाधिपती पीर योगी पारसनाथ यांच्या उपस्थितीत पूजा, अभिषेक करण्यात आले. ही यात्रा अक्षयतृतीयेपर्यंत असते. ‘ग्यानबा तुकाराम, गोरक्षनाथ महाराज की जय’ या जयघोषाने दुमदुमणारे शहर आणि परिसर सुनासुना वाटत होता.
मठाधिपती पीर योगी पारसनाथ, आनंदनाथजी महाराज, स्वप्नील निकम, सेवक व पुजारी यांच्या उपस्थितीत पहाटे साडेतीनला गुप्त अभिषेक तसेच गुप्त कालभैरव रोट प्रसाद करण्यात आला. गेली आठ वर्षे ‘ओम नमो शिवाय’ अखंड जप सुरू असून, आरती, पूजा आदी विधी केले गेले. येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरापासून दोन किलोमीटरवर तोरणा व मोरणा नदीच्या संगमावर गोरक्षनाथ मंदिर आहे. ही पंचक्रोशीतील मोठी यात्रा आहे. यात्रेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच पंढरपूर आदी भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या येतात. आठ दिवस असणाऱ्या या यात्रेच्या दरम्यान सुटीचा काळ असल्याने गर्दी असायची. पण कोरोनाच्या संकटामुळे परिसर सुनासुना झाला आहे.