बालगाव (ता.जत) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाच्या संशोधकांनी ८८४ वर्षांपूर्वीचा शिलालेख शोधून काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी जत तालुक्यातील बालगाव येथे चालुक्यराजा तिसरा सोमेश्वर ऊर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख शोधून काढला आहे. ११३७ मधील हा लेख असून, यामध्ये बालगाव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. सुमारे ८८४ वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिह्याच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.
बालगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. या गावाला प्राचीन इतिहास आहे. येथे प्रा. काटकर आणि कुमठेकर हे संशोधन करीत असताना त्यांना अल्लमप्रभू देवस्थानालगत हळेकन्नड लिपितील भग्नावस्थेतील शिलालेख आढळला. त्याच्या वरच्या भागातील १३ ओळीच शिल्लक राहिल्या आहेत. यावर सूर्य-चंद्र, शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार अशी चिन्हे कोरली आहेत. हा शिलालेख पूर्वी मारुतीच्या देवळात होता. शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, डॉ. महेंद्र बोलकोटगी (जमगी), बालगाव येथील प्रभाकर सलगर, मधु पाटील यांची मदत झाली.
या लेखात बालगावमधील कळमेश्वर स्वामींना बिज्जल कलचुरीने सूर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख आहे. लेखाच्या प्रारंभी कलचुरी राजाच्या बिरुदावल्या आल्या आहेत. कलचुरी राजांमध्ये बिज्जल कलचुरी हा पराक्रमी राजा होता. चालुक्यराजा दुसरा जगदेकमल्ल आणि भूलोकमल्ल याचा तो मांडलिक होता. त्यांना महामंडलेश्वर ही पदवी चालुक्य राजांकडून प्राप्त झाली होती. त्याला पंचमहाशब्दांचा मान मिळाला होता. तसेच शंख, भेरी, मृदंग, श्रृंग व घंटा ही वाद्ये वाजविण्याचा सन्मान मिळाला होता.
बालगावमधील लेखात तो मंगळवेढे येथून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. त्याला लावलेल्या विशेषणांमध्ये युद्धात शत्रूला अत्यंत घनघोर वाटणारा, शूरवीरांचा सूर्य, कलिकालाच्या गळ्यावर रोखलेला अंकुश, शत्रूरूपी हत्तींचा नाश करणारा सिंह, निर्भयपणे पराक्रम गाजविणारा वीर आणि परनारी सहोदर म्हणजे परस्रीचा बंधू यांचा समावेश आहे. यावेळी चालुक्यराजा भूलोकमल्ल तथा तिसरा सोमेश्वर याच्या राज्यारोहणाचे १३वे वर्ष सुरू होते.
बिज्जल कलचुरीचे जिह्याच्या विविध भागात शिलालेख आढळले आहेत. यामध्ये देशिंग-बोरगाव, भाळवणी, वळसंग याठिकाणी शिलालेख सापडले आहेत.
चौकट
कालदृष्ट्या कलचुरीचा पहिला शिलालेख
बिज्जल कलचुरीचा हा जिल्ह्यात सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे. तो चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने ११५६मध्ये चालुक्याचे मांडलिकत्व झुगारून सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर सत्ता प्रस्थापित केली.