अंजर अथणीकर - सांगली -गेल्या शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये १ हजार ३९३ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुमारे दहा हजार ८४१ हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झालेले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यातील द्राक्षे व डाळिंब बागांसह १२ हजार २३४ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. फळबागांसह रब्बी पिकांचे सुमारे सातशे कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस अवकाळी पावसाने विशेषत: तासगाव, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्याला झोडपले. त्यामुळे सर्वाधिक द्राक्ष पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर ज्वारी, गहू, मका, ऊस यांचेही नुकसान झाले. डाळिंब पिकालाही मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने १० हजार ८४१ हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झाले होते. यामधील ८९७ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५० टक्क्यापेक्षा अधिक होते. त्यामुळे ८९७ क्षेत्रातीलच नुकसान मदतीसाठी पात्र ठरले होते. अवकाळी पाऊस कवठेमहांकाळ, खानापूर व तासगाव तालुक्याला नुकसानीचा ठरला आहे. या पावसामध्ये एकूण १ हजार ३९३ हेक्टर क्षेत्र बाधीत ठरले आहे. याचे अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नसून, नजर अंदाज सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. यामध्ये रब्बी क्षेत्र ८५३ हेक्टर असून, द्राक्षे १७१, तर डाळिंबाचे क्षेत्र १०६ हेक्टर आहे. मका क्षेत्र ३२, तर उसाचे क्षेत्र २३१ हेक्टर आहे. गेल्या सप्ताहातील नुकसान हे तीन तालुक्यांतील ५६ गावांमध्ये झाले आहे. या गावांमध्ये सोमवारपासून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या सहकार्याने नुकसानबाधीत क्षेत्राचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसात बाधीत क्षेत्राचे निश्चित आकडे येणार आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. परंतु, गेल्या सप्ताहातील नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर अहवालही राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नोव्हेंबरचा अहवाल शासनाला सादर नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. या महिन्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. त्यामधील ८९७ हेक्टर क्षेत्रामध्ये ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या सप्ताहात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. त्याचाही अहवाल सादर करण्यात येईल.विसापूरमध्ये ८० मि.मी. पाऊसगेल्या शुक्रवारी आणि शनिवारी विसापूर सर्कलमध्ये ८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील नुकसान हे भरपाईस पात्र आहे. यावेळी इतर तालुक्यात झालेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे आहे. मिरज : ३, तासगाव : ३८, कवठेमहांकाळ : ६.३, जत : ४.९, खानापूर : १२.६, कडेगाव : १०. गेल्या शुक्रवारी व शनिवारी झालेल्या नुकसानीचे नजरअंदाज सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष ग्रामसेवक, कृषी सहायक व महसूल कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. येत्या आठ दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर निश्चित नुकसानीचा आकडा मिळेल. हा अहवाल त्यानंतर राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल.- शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, सांगली जिल्हा डिसेंबरमधील नुकसानज्वारी, गहू, हरभरा : ८५३ हेक्टर द्राक्षे :१७१ हेक्टरडाळिंब : १०६ हेक्टरमका : ३२ हेक्टरऊस : २३१ हेक्टरनोव्हेंबरमधील नुकसानद्राक्षे : ८४१४ हेक्टरडाळिंब : २३५६ हेक्टरअन्य पिके : २९.२५ हेक्टर
अवकाळीमुळे ७०० कोटींचे नुकसान
By admin | Updated: December 17, 2014 23:57 IST