जिल्ह्यातील दहा आगारांकडे ८५९ एसटी बसेसपैकी बारा वर्षे वापरलेल्या ९९ बसेस स्क्रॅपमध्ये काढल्या आहेत. तसेच ४३ बसेसचे मालवाहतुकीचे ट्रक केले आहेत. यामुळे सध्या एसटीकडे ७१७ बसेस कार्यरत आहेत. कार्यरत बसेसपैकी ५० बसेस मुंबईला बेस्टची वाहतूक करण्यासाठी हलविल्या आहेत. यामुळे सध्या एसटीच्या सांगली विभागाला बंद फेऱ्यावर एसटी बसेस सोडण्यासाठी बसेसची टंचाई निर्माण झाली आहे. तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत, पण बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षांच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेस दुरुस्त करून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. या बसेसही रोज १०० ते २०० किलोमीटर अंतर धावून येत आहेत. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. एसटीच्या सांगली विभागाकडे शिल्लक ७१७ बसेसमध्येही कालबाह्य बसेसची १०० संख्या असताना, महामंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून एकही लालपरी बसेस मिळाली नाही. स्टील बॉडीच्या या नवीन बसेस प्रवाशांच्या पसंतीस मात्र उतरल्या नाहीत. आगारांकडे नवीन बसेस नसल्यामुळे लांबच्या मार्गावरही जुन्याच बसेस पाठवाव्या लागत आहेत. महामंडळाच्या नियमानुसार तीन लाख किलोमीटरपेक्षा कमी पळालेल्या बसच लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्याचा नियम आहे; परंतु मागील दोन वर्षात फारशा नवीन बसची खरेदी झालेली नाही. यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ७१७ बसेसपैकी ९५ टक्के बसेस तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत.
जिल्ह्यात एसटीच्या ताफ्यात ६५० बसेस पाच वर्षांवरील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST