येलूर : वादळी वाऱ्याने येलूर येथे मसवळ मळा परिसरातील ५ विद्युत खांब पडल्याने येथील २५ कुटुंबाचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे.
येलूर (ता. वाळवा) येथे काल वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. मोठ्या प्रमाणात वारे असल्याने येथील मसवळ मळा परिसरात विद्युत खांबालगत असलेले झाड विद्युत तारांवर पडले. यामुळे या ठिकाणी असलेले पाच विद्युत खांब पडले आहेत. काही शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या पेटी विद्युत खांबालाच असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मसवळ मळा परिसरात २५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. विद्युत खांब पडल्याने शनिवारपासून या ठिकाणचा विद्युतपुरवठा बंद आहे. विद्युतपुरवठा खंडित असल्याने विद्युत पंप बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या जनावरांच्या पाण्याची गैरसोय झाली आहे. संबंधितांनी येथील विद्युत खांबाचे लवकरात लवकर काम करावे व विद्युत पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.