जत : जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ६५० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु ३२७ कोटी रुपये शासनाने सध्या खर्च केल्यास येथील चारा व पाणी टंचाई कमी होऊन खर्चाची बचत होईल, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी दिली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन १७ एप्रिल रोजी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याहस्ते शेगाव (ता. जत) येथील साठवण तलावातील पाणी पूजन होणार आहे, असे सांगून आमदार जगताप म्हणाले की, शासनाकडून ३२७ कोटी रुपये मिळाले, तर दोन मध्यम प्रकल्प, २२ लघु पाटबंधारे तलाव, २०५ पाझर तलाव, २६ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे म्हैसाळ योजनेच्या कॅनॉलमधून आलेल्या पाण्यातून भरून घेता येणार आहेत. याशिवाय १६३ किलोमीटर मुख्य कालवा, खलाटी व अंकले येथील दोन पंपगृह आदी कामे पूर्ण होऊन १७ हजार ६८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. याशिवाय मुख्य कालव्यासाठी फक्त १५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे मंत्री महाजन यांना तालुक्यातील तलाव भरण्याचा आराखडा सादर करण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. जत पंचायत समिती विश्रामगृह इमारत उद्घाटन यावेळी होणार आहे. यावेळी खा. संजय पाटील उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)
जतमध्ये म्हैसाळसाठी ३२७ कोटींची गरज
By admin | Updated: April 16, 2015 00:01 IST