सांगली : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अधिकारी मागण्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे शिक्षकांचे नुकसान होत आहे. पगारही वेळेवर होत नसल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांवर सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हा प्राथमिक शिक्षकांची समन्वय समिती स्थापन केली आहे. दि. ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे दिला आहे. किरण गायकवाड, विनायक शिंदे बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषद प्रशासनाला अनेकवेळा निवेदने दिली आहेत. तरीही त्यांच्याकडून कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. शिक्षकांचे दि. १ तारखेला पगार करण्याचे आश्वासन दिले. पण, कधीही पगार वेळेवर होत नाहीत. विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू केली नाही. दि. १ जानेवारी २००५ पूर्वी लागलेल्या व ज्यांची जुनी भविष्यनिर्वाह निधीची खाती उघडलेली आहेत. त्या शिक्षकांची अंशदान पेन्शन योजनेकडे जमा झालेली रक्कम भविष्यनिर्वाह खात्यात वर्ग करण्याची मागणी करूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अनेक शिक्षकांना अंशदान रकमेचे हिशेब तक्ते मिळाले नाहीत. प्रशिक्षित नसलेल्या शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अप्रशिक्षित वेतनश्रेणी लागू करून फरकाची रक्कम ताबडतोब मिळावी. आंतर जिल्हा बदलीचा प्रश्न निकाली काढला पाहिजे. यामुळे सांगली जिल्ह्यातील बाहेर असणाऱ्या शिक्षकांची अडचण होत आहे. शिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम तालुक्यास वर्ग करावी, यासह अनेक प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)संगणक शिक्षण नसलेल्यांचे वेतन कपात नकोजिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षकांचे संगणक शिक्षण झाले नाही. म्हणून त्यांचे वेतन वसुली करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून केली जात आहे. तसे केल्यामुळे शिक्षकांची आर्थिक कोंडी होत आहे. या शिक्षकांना संगणक शिक्षण घेण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. संगणक शिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या रोखलेल्या वेतनवाढी तात्काळ पूर्ण कराव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीचा ३१ रोजी मोर्चा
By admin | Updated: October 8, 2015 00:59 IST