कुपवाड : शहरातील रामदास पान शॉप ॲन्ड जनरल स्टोअर्स या दुकानात मावा, सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असताना सांगलीतील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये ३१ हजार ६०० रुपयांची सुगंधी तंबाखू आणि माव्याचा साठा जप्त केला आहे. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिसात नोंद झाली आहे. रामदास शंकर व्हनकडे (वय ३६, रा. हनुमाननगर, कुपवाड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
सांगलीतील अन्न व औषध प्रशासनाला कुपवाडमधील रामदास पान शाॅपमध्ये सुगंधी तंबाखू, मावा विक्री सुरू आहे अशी माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी दुकानात छापा टाकला. यावेळी संशयित रामदास व्हनकडे हा सुगंधी तंबाखू व मावा विक्री करीत असताना रंगेहाथ सापडला. अधिकाऱ्यांनी दुकानातील सुगंधी तंबाखू, मावा, कटींग सुपारी, मिक्सर आदी वस्तूंसह ३१ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त केला.
अन्न व औषध प्रशासन अधिकारी रमाकांत महाजन यांनी संशयित रामदास व्हनकडे याच्या विरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्हनकडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक तुषार काळेल तपास करीत आहेत.