सांगली : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सदगुरू साखर कारखाना येथील गौतम शुगर कंपनीची २६ लाख ९६ हजार १४६ रुपयांची अपहार केलेली ३० टन साखर व ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी अनिल शरणाप्पा माळी (वय २१), विकास शिवाज भोसले (३५, दोघेही रा. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बलगवडे (ता. तासगाव) येथे ही कारवाई करण्यात आली.
गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीची ३० टन साखर पुणे येथील ब्रिटानिया कंपनीत पाेहोच करायची होती. मात्र, तिथे साखर न पोहोचवता ट्रक मालक व चालकाने परस्पर साखरेचा अपहार केला होता. याप्रकरणी तुषार मेहता यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली होती.
एलसीबीचे पथक या गुन्ह्याची माहिती घेऊन तपास करत असताना, त्यांना बलगवडे येथील गायरानात ट्रक थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून दोघांना ताब्यात घेतले.
संशयितांनी पोलिसांना सांगितले की, राजेवाडी येथून साखर पुण्यात पोहोच करावयाची असताना, आम्ही ट्रकचा नंबर बदलून पुण्यास न जाता साखर परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी ट्रक व ३० टन साखर असा २६ लाख ९६ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक रविराज फडणीस, अभिजित सावंत, अच्युत सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, अनिल कोळेकर, राहुल जाधव, सतीश आलदर याच्यासह पथकाने ही कारवाई केली.