मिरज : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ’च्या गजरात मिरजेत १७० मंडळांच्या गणेशाचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन झाले. ३० तास सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता संत रोहिदास मंडळाच्या गणेश विसर्जनाने समारोप झाला. सोमवारी सकाळी सात वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे सकाळी ११ वाजता गणेश तलावात विसर्जन झाले. दुपारपर्यंत शहराच्या विविध भागातून सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर आल्या होत्या. सायंकाळी पोलीस ठाणे ते गणेश तलाव मार्गावर मोठी गर्दी झाली होती. बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, लेझीम, टाळ-मृदंग, धनगरी ढोल आदी पारंपरिक वाद्यांवार तरुणांचे नृत्य सुरू होते. अनेक मंडळांनी डॉल्बीचाही वापर केला. व्यापारी गणेश मंडळाच्या मोर, घोडा आदी मुखवट्यांचे नृत्य, तसेच गुरुवार पेठ मंडळाच्या खेळाडूंच्या दोरीवरच्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विठ्ठल गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वेशात टाळ-मृदंगासह मिरवणूक काढली. मिरवणुकीत पालखी व बैलगाड्यांचा समावेश होता. काही मंडळांनी जय मल्हारच्या प्रतिमेसह मिरवणूक काढली होती. वेगवेगळी वाद्ये, विद्युत रोषणाई व उंच गणेशमूर्ती वगळता यावर्षी मिरवणुकीत सजीव देखाव्यांचा अभाव होता. रात्री बारापर्यंत वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक मार्ग व मार्केट चौक गर्दीने फुलला होता. मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गर्दी होती. मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत होत्या. रात्री बारा वाजता वाद्ये बंद करण्यात आल्याने मिरवणूक मार्गावरील गर्दी कमी होऊन मिरवणूक गतीने पुढे सरकली. पहाटे पाच वाजता गणेश तलावात तेली गल्ली मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. गणेश तलावात १३५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन झाले. मात्र त्यानंतर कृष्णा नदीत विसर्जनासाठी गेलेल्या मोठ्या व उंच गणेशमूर्तींचे क्रेनने विसर्जन करण्यास विलंब होत असल्याने विसर्जन समारोप दुपारी साडेबारापर्यंत लांबला. दुपारी साडेबारा वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शिवगर्जना, कैकाडी समाज व संत रोहिदास मंडळाच्या उंच गणेशमूर्तींचे क्रेनने नदीत विसर्जन करण्यात आले. गणेश तलावात १३५ व कृष्णा नदीत ३५ सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले. (वार्ताहर)पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा विसर्जन बंदोबस्तासाठी मिरजेत उपस्थित होता. सोमवारी सकाळपासून विसर्जन मिरवणूक सुरू असल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. मिरवणूक मार्गाकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर सुमारे ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची नजर होती. पोलिसांच्या नियोजनामुळे विसर्जन सोहळा गतवर्षीच्या तुलनेत लवकर संपला.मिरवणूक मार्गावर विविध पक्ष, संघटनांतर्फे उभाण्यात आलेल्या स्वागत कमानी व कक्षातून मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. खासदार संजय पाटील, विश्वजित कदम, महापौर कांचन कांबळे, महापालिका आयुक्त अजिज कारचे, प्रांताधिकारी हेमंत निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, पंडितराव कराडे, गजेंद्र कुल्लोळी, मनसेचे दिगंबर जाधव, जनसुराज्य पक्षाचे समित कदम, रिपाइंचे विवेक कांबळे, अशोक कांबळे यांच्यासह सर्व पक्षांचे इच्छुक उमेदवार स्वागत कक्षात उपस्थित होते. मिरवणुकीत पोलिसांची ध्वनिमापक पथके कार्यरत होती. मात्र पोलिसांचा प्रतिबंध झुगारून अनेक मंडळांनी डॉल्बीचा वापर केला. मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘गाडी सुटली शिट्टी वाजली’, ‘आता माझी सटकली’ ही गाणी सर्वत्र वाजत होती. मित्रप्रेम, अमोल हिंद यांसह काही मंडळांच्या महिला ढोलपथकाने लक्ष वेधून घेतले.
मिरजेत ३० तास विसर्जन मिरवणूक
By admin | Updated: September 9, 2014 23:47 IST