सांगली : महापुराचा फटका बसलेल्या कुटुंबांना १० हजार रुपयांप्रमाणे मदत बॅंक खात्यांवर जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. आजअखेर २९ हजार ५६८ कुटुंबांना २९ कोटी ५६ लाख ८० हजार रुपयांची मदत दिल्याचे ते म्हणाले.
मिरज, पलुस, वाळवा व शिराळा तालुक्यांतील बाधित कुटुंबांना मदत देण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात १५ हजार ५६८ कुटुंबांच्या खात्यांवर मदत जमा झाली आहे. मिरज ग्रामीण क्षेत्रात ५३३ कुटुंबे, सांगली ग्रामीण क्षेत्रात ३ हजार ११०, वाळवा तालुक्यात ३ हजार ६००, आष्टा परिसरात १ हजार २३० , शिराळा तालुक्यात ७३६, पलूस तालुक्यात ४ हजार ७९१ कुटुंबांना मदत दिली आहे. शासनाकडे अतिरिक्त अनुदानाची मागणीही करण्यात आल्याचे डॉ. चौधरी म्हणाले.