सांगली लोकसभा मतदारसंघातील जत, पलूस, तासगाव, खानापूर, मिरज या तालुक्यातून रस्ते व पुलांच्या कामासाठी निधीची मागणी होत होती. खा. संजयकाका पाटील यांनी केंद्रस्तरावर पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील रस्ते रुंदीकरण सुधारणासह पुलांच्या कामासाठी २६ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जत तालुक्यातील कर्नाटक हद्द-जत-निगडी-येळवी-लोणार-जाडरबोबलाद-सोन्याळ रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ९६ लाख, पलूस तालुक्यातील भिलवडी ते चोपडेवाडी या रस्त्यावरील सरळी ओढ्यावर पूल बांधणे व रस्ता सुधारणा करणे यासाठी ३ कोटी ३८ लाख, ब्रह्मनाळ ते सुखवाडी रस्त्यावरील सावकार ओढ्यावर पूल बांधणे व रस्ता सुधारणा करणे यासाठी १ कोटी ३५ लाख, तासगाव तालुक्यातील सावळज-अंजनी-गव्हाण-मणेराजुरी-कुमठे फाटा रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे यासाठी ३ कोटी ९२ लाख रुपये मंजूर असून यासह विविध कामे करण्यात येणार आहेत. हा निधी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधीमधून मंजूर केल्याची माहिती खा. संजयकाका पाटील यांनी दिली.
चौकट
जादा निधी मिळविणार
जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने २६ कोटी ४८ लाखांचा निधी मजूर आहे. जिल्ह्याच्या रस्त्यासह अन्य विकास कामासाठी आणखी भरीव निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.