सांगली : मिरजेतील प्रसिद्ध ख्वाॅजा मीरासाहेब दर्गा परिसर विकास आराखड्याला बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दर्गा विकासासाठी दरवर्षी २५ कोटींचा निधी देण्याची ग्वाहीही पवार यांनी दिली. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला दर्गा परिसर विकासाचा मार्ग खुला झाला आहे.
हिंदू-मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या मीरासाहेब दर्गा परिसराचा विकास करण्याची मागणी काही वर्षांपासून होत आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने दर्गा परिसर विकासाचा १५६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. यात मीरासाहेब दर्गा मूळ इमारतीचे विस्तारीकरण व सुशोभीकरणासह जुन्या वास्तूंचे मजबुतीकरणासाठी ८६.११ कोटी, दर्गा परिसरातील मुख्य रस्ते व गावठाणातील जोडरस्ते दिवाबत्तीच्या सुविधेसह काँक्रिटकरणासाठी ३३.१८ कोटी, पंढरपूर रस्त्यालगत शाही दर्गा व परिसरअंतर्गत दोन भूखंडांचा विकासासाठी: १९.३८ कोटी, कुपवाड येथील आरक्षित जागेवर वारकरी व सार्वजनिक वापरासाठी सुविधा व बगीचा विकासासाठी १७.६८ कोटींचा समावेश आहे.
या आराखड्याबाबत मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला माजी महापौर मैनुद्दीन बागवान उपस्थित होते, तर पालिका आयुक्त नितीन कापडणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे हे ऑनलाइन हजर होते. याबाबत बागवान व कापडणीस यांनी दर्गा परिसर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी पवार यांनी एकाचवेळी १५६ कोटी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करीत पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी देऊ. त्यानंतर पुढील सहा वर्षे टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे सांगत विकास आराखड्याला मंजुरी दिली.
चौकट
बागवान यांचा पाठपुरावा
मिरज दर्गा परिसर विकासासाठी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सातत्याने पाठपुरावा केला. बागवान म्हणाले की, आयुक्त कापडणीस यांच्याकडून दर्गा परिसर विकास आराखडा तयार करून घेतला. त्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी प्रयत्न केले. पाटील यांच्या पुढाकारानेच बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. उपमुख्यमंत्र्यांनी आराखड्याला मंजुरी दिल्याने दर्गा परिसर विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो ओळी : मिरजेतील मीरासाहेब दर्गा परिसर विकास आराखड्याबाबत मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान उपस्थित होते.