लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कामेरी-तुजारपूर रस्त्यालगत राजारामबापू व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला नोंद असणारा २० ते २५ एकर ऊस सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आगीत जळाला. यात १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ही आग विजेच्या शॉर्टसर्किटने लागल्याचे परिसरातील शेतकरी सांगत असले, तरी वीज वितरण कंपनीच्या कामेरी कार्यालयातील कनिष्ठ शाखा अभियंता जितेंद्र पाटील यांनी मात्र ही शक्यता नाकारली आहे. इस्लामपूर येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी सकाळी १०.३० ते ११.२५ या वेळेत वीजपुरवठा बंद असल्याने शॉर्टसर्किटने आग लागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामेरी येथील पांढरी परिसरातील सुदर्शन पाटील, कापसे मळा, माळी, मदने मळ्यातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या २५ एकर उसाला सकाळी अचानक आग लागली. साडेअकराच्या सुमारास सुदर्शन पाटील, श्रीकांत पाटील, प्रदीप पाटील, मुकुंद माळी यांनी या आगीबाबतची माहिती कोतवाल आनंदराव ठोंबरे यांना दिली.
इस्लामपूर येथे व वीजपुरवठा बंद असल्याने अग्निशमन गाडी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. श्रीकांत पाटील व मुकुंद माळी यांच्या वस्तीवरील घराकडे आग येऊ लागली होती. त्यावेळी ग्रामस्थ व युवकांनी पाणीपुरवठा संस्थेच्या चेंबरमधून पाणी उपलब्ध करून आग विझवली.
आगीमध्ये ऊस पूर्ण जळाल्याने अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज तलाठी रामेश्वर शिंदे यांनी व्यक्त केला. मंडल अधिकारी मनोहर पाटील यांनी पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राजारामबापू व कृष्णा कारखाना ऊसतोडणी कार्यालयात शेतकऱ्यांनी जळीत उसाची नोंद केली असून मंगळवारपासून या उसाची तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न करू, असे सांगण्यात आले.