शनिवारी संपूर्ण सांगली जिल्ह्यातच कोरोना रुग्णांसाठी पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला. तासगाव येथील हॉस्पिटलमध्येही थोडा वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता. ही गोष्ट समजताच खासदार संजय पाटील यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथील ऑक्सिजनची भयानकता लक्षात आल्यानंतर खासदारांनी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून सूत्रे हलवायला सुरुवात केली. नगरसेवक अनिल कुत्ते, जाफर मुजावर, माजी नगरसेवक शरद मानकर यांच्यासह ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कुत्ते, मुजावर आणि मानकर यांनी तासगाव शहरासह कवठेएकंद भागातून वेल्डिंगवाले, गॅस कटर करणारे व इतर ठिकाणांवरून सुमारे २० जंबो सिलिंडर जमा केले. शिवाय खासदार पाटील यांनीही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी, तहसीलदार ढवळे यांच्या मदतीने सांगली येथील क्रीडा संकुल येथून सह व तुरची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर येथून सहा सिलिंडर जमा केले. जमा झालेल्या ३२ सिलिंडरच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात आला.
चाैकट
अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही धडपड
तहसीलदार कल्पना ढवळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील हे स्वतः ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी रात्रभर धडपड करीत होते. तसेच पालिकेचे प्रताप घाडगे, रामभाऊ औताडे, आयुब मनेर, यांच्यासह गाडी चालक सुरेश देवकुळे, संजय माळी यांनीही ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी धडपड केली. वाहनाला लाईट नसतानाही अक्षरशः अंधारात गाडी चालवत देवकुळे, माळी आणि औताडे यांनी इस्लामपूर येथून डुरा सिलिंडर आणून रुग्णांचे प्राण वाचवण्यात सिंहाचा वाटा उचलला.