सांगली : पेठ-सांगली रस्त्याच्या बळकटीकरणासाठी २२ कोटी ६२ लाख रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
पेठ-सांगली रस्त्यासाठी येथील सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने केली होती. त्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविले आणि हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. यापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले असले तरी ते चांगल्या दर्जाचे झाले नसल्याने नाराजी व्यक्त होत होती.
भाजपचे मकरंद देशपांडे यांनी याबाबत गडकरी यांच्याकडे या रस्त्याच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी केली होती. गडकरी यांनी याबाबत रविवारी सायंकाळी घोषणा केली. २२ कोटी ६२ लाख रुपये मंजूर केले असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामावरुन वारंवार वाद निर्माण झाले होते. एकाचवेळी या रस्त्याचे बळकटीकरण करुन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली होती. नव्याने मंजूर झालेल्या कामात कोणत्या कामांचा समावेश आहे, याबाबतचा तपशील अद्याप समजलेला नाही.
या रस्त्याबरोबरच तानंग, वानलेस रुग्णालय, शिवाजी रोड ते शास्त्री चौक या रस्त्याच्या बळकटीकरणाबाबतही लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन गडकरी यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिले आहे.
चौकट
सांगली-अंकलीबाबतही प्रस्ताव
भाजप नेते मकरंद देशपांडे म्हणाले की, सांगली-अंकली हा रस्ताही राष्ट्रीय महामार्गास चौपदरीकरण करुन जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रलंबित रस्त्याबाबत खासदार संजयकाका पाटील व मिरजेतील रस्त्याबाबत आ. सुरेश खाडे यांनीही गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. त्याबाबतही गडकरी यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.