वारणानगर : वारणा साखर कारखान्याने गत हंगामातील उसाच्या मोबदल्यापोटी आतापर्यंत प्रतिटन २000 रुपये शेतकऱ्यांना दिले असून, पुढील आठवड्यात २00 रुपये व दिवाळीला १९५ रुपयांचा अॅडव्हान्स देण्याची घोषणा वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांनी मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ‘बुट’ तत्त्वावर उभारलेल्या ४४ मेगावॅट क्षमतेचा ‘को जनरेशन’ प्रकल्प कारखाना मालकीचा करण्याबाबत संचालक मंडळाला अधिकार देण्याचा निर्णयही घेण्यात आला. येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी वारणा विद्यामंदिरच्या पटांगणावर झाली. त्यावेळी कोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्षा शोभाताई कोरे होत्या.विनय कोरे म्हणाले, सार्वजनिक वितरणासाठी झारखंड शासनाची एक किलो पॅकिंगमधील साखरेची निविदा वारणा कारखान्यास मिळाली असून, सुमारे सात लाख ७२ हजार क्विंटल साखर पुरविण्याची निविदा वारणेने मिळविली आहे. यामुळे साखरेचा उठाव होण्यास मदत होणार आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना चांगला दर देण्यासाठीही त्याची मदत होणार आहे.सध्या साखर कारखानदारीवर भयानक संकट आले असून, शेतकरीही या संकटास खंबीरपणे सामोरे गेले असून साखरेचा उठाव व दर निर्यातीस प्रोत्साहन असे निर्णय केंद्र शासनाने घेतल्यास साखर कारखानदारीस चांगले दिवस येतील. यावेळी शेतकरी शिवाजी भोसले (कोडोली), शंकर शिंदे (बुवाचे वाठार), सर्जेराव पाटील (भादोले), गुंंडू दणाणे (किणी), विश्वास पाटील (कोडोली) या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन गौरव प्राप्त केल्याबद्दल विनय कोरे यांच्या हस्ते गौरव केला.वारणा दूध संघाचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी, उपाध्यक्ष विलासराव पाटील, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व्ही. एस. चव्हाण, कायदे सल्लागार अॅड. शिवाजीराव चव्हाण उपस्थित होते. सचिव बी. जी. सुतार यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोले यांनी नोटीस वाचन के ले. दीपक झावरे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आभार मानले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुकाध्यक्ष शिवाजी माने यांनी वारणेने सातारा, कऱ्हाड भागातील ऊस गाळपास न आणता प्रथम कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करावे, अशी मागणी के ली. (वार्ताहर)
पुढील आठवड्यात २00, तर दिवाळीला १९५ रुपये
By admin | Updated: September 29, 2015 23:56 IST