शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बसेसना अँटी मायक्रोबियल कोटिंग केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळणार आहे. आतापर्यंत २०० गाड्यांना कोटिंग झाले आहे. एसटी बसेस कोरोना फ्री झाल्या, तरीही प्रवाशांना आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात भीतीपोटी प्रवाशांची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे महामंडळाने अँटी मायक्रोबियल कोटिंगचा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यातील सर्व आगारात कोटिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोटिंग झाले तरी प्रवाशांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनेकदा प्रवाशी विनामास्कच बसमध्ये बसलेला असतात. त्यांची बेफिकिरी कोरोना निमंत्रण देऊ शकते.
चौकट
एका एसटीला वर्षातून चारवेळा होणार कोटिंग
बसमधील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, दरवाजा, चालकाची केबिन, फ्लोअरिंग कोटिंग केले जात आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा धोका कमी होणार आहे. एका एसटीला वर्षातून चारवेळा कोटिंग केले जाणार आहे.
चौकट
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूलाच बसला असल्यास?
१. बसना कोटिंग केल्याने कोरोना विषाणू, बुरशी व इतर जीवाणूपासून प्रवाशांचे संरक्षण होणार आहे.
२. पण कोरोनाबाधित व्यक्ती प्रवासांत सोबत बसली असली तर इतर प्रवाशांना धोका कायम आहे. बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर, दुसरा प्रवासी बसल्यास कोरोनाचा धोका कमी असेल.
चौकट
विभागीय नियंत्रक म्हणतात...
जिल्ह्यात ४२३ एसटी बस आहेत. त्यापैकी २०० हून अधिक बसना कोटिंग करण्यात आले आहे. १०० हून अधिक बस गणेशोत्सवासाठी कोकण, मुंबईला गेल्या आहेत. त्या चार दिवस परत येतील. येत्या आठवडाभरात कोटिंगचे काम पूर्ण होईल. - अरुण वाघाटे, विभागीय नियंत्रक
चौकट
प्रवासी म्हणतात...
१. एसटी महामंडळाने कोरोनाच्या बचावासाठी कोटिंगचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल. - सचिन पाटील
२. एसटीने प्रवास करताना अनेकदा कोरोनाची भीती वाटत होती. पण आता कोटिंगमुळे विषाणूचा धोका कमी झाला आहे. तरीही मास्कचा वापर प्रवाशांना बंधनकारक करण्याची गरज आहे. - रवींद्र भोसले