कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ५६ पैकी ३९ गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीत केला आहे. परंतु खरीप हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १७ गावांचा दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ५० पैसे कमी पैसेवारी असतानाही या १७ गावांवर अन्याय का?, असा संतप्त सवाल या गावांचे नागरिक करीत आहेत. जि. प. सदस्य सुरेश मोहिते यांनी या गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये करण्याबाबतचे निवेदन दिले होते. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. तसा अहवालही प्रांताधिकारी, कडेगाव यांच्याकडून शासनाकडे पाठविला आहे. परंतु शासनाच्या लाल फितीच्या कारभारात हा प्रस्ताव अडकला आहे.शासनाने राज्यात दुष्काळसदृश गावांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील ३९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु वंचित राहिलेल्या १७ गावांना दुष्काळी गावांच्या सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे.शेती वीजबिलात ३३.५ टक्के सूट, महाविद्यालय, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, आवश्यकतेप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा, शेतीपंपांची वीजबिल थकबाकीमुळे वीज तोडण्यास बंदी आदी सुविधांपासून ही गावे वंचित राहिली आहेत. कडेगाव तालुक्यातील वंचित गावे व कंसात पैसेवारी अशी - वांगी (४७), शिवणी ४४, हिंगणगाव (खुर्द) ४७, वडियेरायबाग ४४, शेळकबाव ४६, रामापूर ४७, चिंचणी (वांगी) ४७, देवराष्ट्रे ४७, शिरगाव ४६, मोहित्यांचे वडगाव ४६, कुंभारगाव ४६, सोनकिरे ४७, पाडळी ४७, सोनसळ ४५, शिरसगाव ४४. या सर्व गावांची २०१५-१६ ची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आहे. तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित गावांची पैसेवारी ५० पैशाच्या खाली असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून या गावांचा समावेश दुष्काळसदृश गावांच्या यादीमध्ये करावा, अशी मागणी होत आहे.कडेगाव तालुक्यातील या १७ गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांमध्ये करावा, अन्यथा शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेश मोहिते यांनी दिला. याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. (वार्ताहर)सर्वात कमी पावसाची नोंद असतानाही चिंचणी वंचित चिंचणी (वांगी) येथे पावसाळ्यात केवळ २६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वात कमी पाऊस चिंचणी (वांगी) येथे झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शिवाय पीक उत्पादनाची पैसेवारीही ५० टक्केपेक्षा कमी म्हणजेच ४७ टक्के इतकीच आहे. तरीही दुष्काळसदृश गावांच्या यादीत चिंचणी (वांगी) गावाचा समावेश नाही. चिंचणी (वांगी) गावाचा समावेश तातडीने दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करावा, अशी मागणी सरपंच संजय पाटील यांनी केली आहे.
१७ गावे सवलतींपासून वंचित
By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST