सांगली : सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील सुमारे पाचशे बँकांमधील सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. बँकांचा व्यवहार आता सोमवारी सुरु होणार आहे. बँका बंदमुळे एटीएमवर मात्र परिणाम झालेला नाही. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळली आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखांची संख्या १८० असून, व्यापारी, मध्यवर्तीसह खासगी बँकांची संख्या साडेतीनशेहून अधिक आहे. राष्ट्रीय बँकांमधून रोजची शंभर ते दीडशे कोटीची उलाढाल होत असते. इतर बँकांमध्ये रोजची जवळपास दोनशे कोटीची उलाढाल होत असते. काल, गुरुवारपासून विविध कारणांमुळे बँका बंद आहेत. बँकांचे व्यवहार सोमवारपासूनच सुरु होणार आहेत. या चार दिवसांमध्ये दीड हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे.बँकांना सुट्ट्या असल्या तरी, याचा एटीएम सेवेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. सांगली जिल्ह्यामध्ये एटीएममधून जवळपास शंभर कोटीची उचल होत असते. सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये भरणा करणाऱ्या कंपन्यांकडून यापूर्वीच दोनशे कोटी रुपये अधिक उचलण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसातही एटीएमच्या सेवेवर परिणाम होणार नसल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)बँक कर्मचारी मात्र रात्रभर कामावर सलग सुट्ट्यांचा आनंद कर्मचारी लुटू शकले नाहीत. आर्थिक वर्ष संपल्यामुळे गुरुवारपासूनच बँक अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. वार्षिक ताळेबंद पूर्ण करण्यासाठी बँकांचे कर्मचारी शनिवारी व रविवारी दिवसभर व रात्री अकरा वाजेपर्यंत बँकेत थांबूनच काम करतील, अशी माहिती बँक अधिकारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी यांनी दिली.
१५०० कोटींची उलाढाल ठप्प
By admin | Updated: April 3, 2015 23:19 IST