सांगली : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने जिल्ह्यासाठी १३३ कोटी ७९ लाख ३७ हजार रुपये मंजूर केले आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांसह अपार्टमेंटमधील कुटुंब, दुकानदारांना पुढील आठवड्यापासून भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. दरम्यान, यापूर्वी २९ हजार ५६८ कुटुंबांना दहा हजारांप्रमाणे २९ कोटी ५० लाख रुपयांचे वाटप केले आहे.
महापुराचा सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील ११३ गावांना तडाखा बसला. वारणा, कृष्णा नदीकाठावरील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांची ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली होती. पूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले होते. चार तालुक्यांतील ११३ गावे बाधित झाली होती. महापुराचे पाणी आलेले आणि पाण्यामुळे स्थलांतरित झालेल्या ७३ हजार ९६७ कुटंबांचे पंचनामे केले आहेत. ५२३ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पक्की घरे १७४ पडली आहेत. दोन हजार ९०० कच्ची घरांचे काहीप्रमाणात, तर एक हजार ३८४ पक्क्या घरांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एक हजार ५०० गोठ्यांचीही पडझड झाली आहे. १९ झोपड्यांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. पुराच्या पाण्यामुळे १२१ लहान व मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. शेती, कुटुंबाशिवाय व्यापाऱ्यांनाही पुराचा फटका बसला. बारा हजार ५८३ दुकानदारांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. ९४५ बारा बलुतेदारांसह ७ हजार २४३ छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
राज्य शासनाने शुक्रवारी पूरग्रस्तांच्या मदतीचे आदेश काढले. राज्यातील पूरग्रस्तांसाठी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपये निधी मंजूर केला. यामध्ये सांगली जिल्ह्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तरतुदीनुसार १५ कोटी ५३ लाख ५२ हजार आणि राज्य शासनाने दिलेली ११८ कोटी २६ लाख ३७ हजार रुपये मिळाले आहेत. एकूण जिल्ह्यासाठी १३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निधी वाटपाचे आदेश दिले आहेत. पूरग्रस्त लाभ घेणाऱ्यांची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आलेला निधी
-सानुग्रह अनुदान : ४७.९४ कोटी.
-मृत जनावरे : ३४.५१ लाख.
-घरांची पूर्ण/अंशत पडझड : १८.१९ कोटी.
-मत्स्य व्यावसायिक : १.५२ कोटी.
-हस्तकारागीर, बारा बुलतेदार : ३.७० कोटी.
-दुकानदार : ५५.१९ कोटी.
-शेतजमीन नुकसान : २.३७ कोटी.
-मदत छावणी : १.४१ कोटी.
-कुक्कटपालन शेड : ४.३१ लाख.
-सार्वजनिक ठिकाणावरील कचरा उचलण : ३.४८ कोटी.