लोकमत न्यूज नेटवर्क
जत : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून मागील चौदा महिन्यांत जत तालुक्यातील विविध विकासकामांच्या माध्यमातून ११२ कोटी दहा लाख रुपयांचा निधी आणला आहे. त्यापैकी १७ कोटी ३७ लाख रुपये डीपीडीसीमधून आणले आहेत, अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, जतच्या पूर्वभागात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित कामातून पाणी नेण्यासाठी पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीला पाझर व साठवण तलाव भरून घेतले जाणार आहेत. सहकार व खासगी उद्योगांना प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न आहे. जत तालुक्यात मुचंडी, कोळीगिरी, कुंभारी किंवा कुलाळवाडी यापैकी एका ठिकाणी लहान औद्योगिक वसाहत सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. पाण्याचे नियोजन व दळणवळणाची सोय बघून औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू.
ते म्हणाले की, म्हैसाळ योजनेच्या कालव्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या, त्या चार गावांतील ४९ शेतकऱ्यांना नऊ कोटी ५० लाख रुपये दिले आहेत.
बिरनाळ येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. येथे तयार झालेली वीज शेतकऱ्यांना प्रथम देऊन त्यानंतर उर्वरित वीज कंपनीला देण्यात येणार आहे. म्हैसाळ योजना किंवा कर्नाटक राज्यातून येणारे पाणी यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. राजकीय श्रेय घेण्यासाठी विरोधक आडकाठी आणत आहेत.
ते म्हणाले की, तालुक्यात पोलीस कवायत मैदान परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. येत्या १४ एप्रिल रोजी या नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, सुजय शिंदे, संतोष कोळी, ॲड. युवराज निकम आदी उपस्थित होते.