सांगली : जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ग्राहक व कृषिपंपांच्या वीज बिलांची थकीत रक्कम तब्बल एक हजार १०७ कोटींवर गेली आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. ग्राहकांकडून वीज बिल भरण्यास थंडा प्रतिसाद असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तीन लाख ८६५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १०७ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत ग्राहकांना वारंवार सूचना देऊनही त्यांची थकबाकी वसूल होत नाही. यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरु आहे. कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे एक हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी महावितरणच्या कृषी वीज धोरणाचा लाभ घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोनशे कोटी रुपये भरले आहेत. या शेतकऱ्यांच्या थकीत रकमेवरील व्याजासह अन्य वीज बिल सवलतीचाही त्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे कृषिपंपधारकांची थकीत वीज बिल एक हजार कोटी रुपये शिल्लक राहिली आहे. यापैकी काही शेतकरी वीज बिल भरत आहेत. काही शेतकऱ्यांकडून मात्र कृषिपंपांच्या चालू वीज बिलांचा देखील भरणा होत नसल्याने नाईलाजाने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.