इस्लामपूर : जिल्हा बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चुलत्यानेच पुतण्याला ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार मार्च २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत घडला आहे. या फसवणूकप्रकरणी सोमवारी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
रूपाली तुषार काटकर (इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चुलता हणमंत कृष्णा भोई, विजयमाला हणमंत भोई (दोघे रा. बोरगाव, ता. वाळवा) आणि धनाजी आण्णा शिंदे (इस्लामपूर) अशा तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मार्च २०१४ मध्ये रूपाली काटकर यांचा भाऊ अवधूतला जिल्हा बँकेत नोकरीला लावतो, त्याची जाहिरात निघणार आहे, असे आमिष हणमंत भोई याने दाखवले. त्याला परीक्षेला बसवून पास करतो, त्यासाठी सात लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. एवढे पैसे जवळ नसल्याने रूपाली यांनी साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हणमंत आणि विजयमाला भोई यांच्याकडे दिले. त्यानंतर पाच वर्षांनी २०१९ मध्ये बँकेतील नोकर भरतीची जाहिरात निघाली होती. त्यासाठी अवधूत याने अर्ज करून परीक्षाही दिली होती. रूपाली यांनी चुलता हणमंत भोईकडे भाऊ अवधूतच्या नोकरीबाबत विचारणा केल्यावर भोई याने आता किमान १७ ते १८ लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यावर रूपाली काटकर यांनी पुन्हा पती तुषार यांच्या नावे कर्ज प्रकरण करून आणि इतर नातेवाईकांकडून उसने घेऊन ९ लाख ५० हजार दिले.
जिल्हा बँकेतील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही अवधूत यास नोकरी न मिळाल्याने रूपाली काटकर यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी हणमंत भोई याने इस्लामपूरमधील धनाजी शिंदे यांना मध्यस्थ केले आणि त्यांच्याच बँक खात्यावरील ११ लाख रुपयांचा धनादेश रूपाली काटकर यांना दिला. हा धनादेश बँकेत तीनवेळा न वटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रूपाली काटकर यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली.