दत्तात्रय पाटील यांचे तासगाव बेदाणा मार्केट येथे भवानी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते बेदाणा व्यवसाय करताय. ५ ऑक्टाेबर २०१९ रोजी त्यांना ए. जे. एक्स.आय. सी.एम. ऑनलाईन फूड मार्केटिंग अम्म्यानकट्टूर, सालेम, तमिळनाडू या कंपनीकडून ५ हजार किलो बेदाणा ऑर्डर आली. संबंधित पार्टीबरोबर त्यांचे फोनवर दराबाबत बोलणे झाले. यानंतर त्यांनी ११ ऑक्टाेबर २०१९ राेजी १० लाख २५ हजार १४३ रुपये किमतीचा ५०९८ किलो बेदाणा गुरुकृपा रोडलाईनने पाठविला. त्याची बिले व रिसिट त्यांच्याकडे आहेत.
माल पाठवल्यानंतर दोन दिवसांत पैसे देण्याचे ठरले होते. मात्र, माल पोहोच झाल्यानंतर संबंधित व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने फोन उचलणे बंद केले. यानंतर पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी तासगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.