- प्रतिनिधी
मेनोपॉज हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा. वयाच्या 40 ते 50 च्या दरम्यानचं स्त्रियांचं आयुष्य हे अतिशय गजबजलेलं, कामाने आणि जबाबदा-यांनी वेढलेलं असतं. नेमक्या याच टप्प्यावर मेनोपॉज चाहुल द्यायला लागतो. पण या चाहुलीकडे लक्ष द्यायला , त्याची दखल घ्यायला, शरीर , मनात होणारे बदल समजून घ्यायला, त्यावर उपाय करायला स्त्रियांकडे ना उसंत असते ना त्याबाबतची जाणीव, ना माहिती! अचानक कधीकधी अस्वस्थ होतं. सगळं छान असताना मनावर निराशेचं मळभ दाटतं. हार्मोनच्या असंतुलनाचा हा परिणाम. पण या सर्वाकडे नेहेमीप्रमाणोच दुर्लक्ष करण्याची सवय स्त्रियांना असते. पण मिशेल ओबामा, अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मात्र या विषयावर आवजरून बोलल्या आहेत. ’मिशेल ओबामा पॉडकास्ट’ या कार्यक्रमात डॉ. शेरॉन मॅलोन (वॉशिंग्टन डीसी येथील स्रीरोग तज्ज्ञ) या आपल्या मैत्रिणीसोबत त्यांनी मेनोपॉज या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मिशेल म्हणतात, हार्मोन्सच्या असंतुलनानं होणारे बदल हे हार्मोन थेरपीच्या मदतीनं आटोक्यात आणता येतात. ही थेरेपी मी स्वत: घेतली आहे. पण यासाठी स्वत:ला काहीतरी होतंय हे आधी ओळखता तर यायला हवं. बराक प्रेसिडेंट असताना मी ही थेरेपी सुरू केली होती. मला हॉट फ्लशेसचा ( शरीरातून गरम वाफा निघणं) त्रास होत असे. एकदा तर मी छान तयार होऊन एका कार्यक्रमासाठी बाहेर पडणार होते पण अचानक कोणीतरी आतून आग लावावी एवढी शरीराची आग व्हायला लागली. मी घामानं ओथंबलेले होते. बराक माझ्या शेजारी होते. मला काय होतंय याची त्यांना जाणीव होती. मुळात त्यांच्या कार्यालयातील महिला कर्मचा:यांपैकी अनेकजणी मेनोपॉजच्या टप्प्यात होत्या. विनाकारण घामानं ओथंबलेल्या स्त्रियांना ओबामांनी बघितलं होतं. मला आराम मिळावा यासाठी त्यांनी लगेच एसीचं तापमान अजून कमी केलं.’ मेनोपॉजच्या या टप्प्यातून स्त्रिया जात असतात, तेव्हा घरी दारी या बदलाला समजून घेईल अशी ना व्यवस्था असते ना व्यक्ती. त्यासाठी महिलांनी स्वत: संवेदनशील असायला हवं. आपल्या शरीर मनात जो बदल होतो तो समजून घ्यायला हवा. त्याबदल मनमोकळेपणानं बोलायला हवं.