देवरुख : घरात काेणीच नसल्याचे पाहून १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना धामणी गावातील काकवळ वाडी (ता. संगमेश्वर) येथे शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. अवधूत भारत मेस्त्री असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ताे गेल्याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला हाेता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद चंद्रकांत शांताराम सुतार यांनी दिली आहे. अवधूत वडील, आई, आजी आणि लहान भावासाेबत राहत हाेता. त्याचा स्वभाव मनमिळावू असाच हाेता. अवधूत हा शनिवारी घरामध्ये एकटाच होता. त्याचे वडील लहान भावाला घेऊन कोंबड्यांसाठी खाणे आणण्यासाठी सकाळी १०.३० वाजता बाजारात गेले होते, तर आई आणि आजी मजुरीच्या कामासाठी बाहेर गेल्या हाेत्या. घरातील मंडळी घरी परतल्यानंतर अवधूत काेंबड्यांच्या शेडमधील लाेखंडी बारला नायलाॅन दाेरीच्या सहायाने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्याला गळफास लावलेल्या स्थितीत पाहताच घरच्यांनी एकच हंबरडा फोडला. या आवाजाने वाडीतील ग्रामस्थांनी मेस्त्री यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. तत्काळ याची माहिती संगमेश्वर पोलीस स्थानकात देण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, संतोष झापडेकर, स्वप्नील तेरवणकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केला.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात अवधूत याच्या शवाचे विच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव करीत आहेत. दरम्यान, अवधूतने घरालगत असणाऱ्या कोंबड्यांच्या शेडमधील लोखंडी बारला नायलॉन दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.