लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेराेना संक्रमणाची अजूनही काहींना भीती वाटत नाही. निर्बंध असले, तरी काेणती ना काेणती कारणे सांगून अनेक जण घराबाहेर पडत आहेत. काेराेनाचे वाढते संक्रमण आणि नागरिकांचा निष्काळजीपणा, यामुळे मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. काेराेनापासून नागरिकांनी दूर राहावे आणि आपले प्राण वाचवावेत, असा संदेश देणारा देखावा मिरजाेळे (ता.रत्नागिरी) येथील पाडावेवाडीतील श्रीकांत पाडावे यांनी साकारला आहे. या देखाव्यातून त्यांनी ‘यम फिरताेय घराघरात’ असे चित्र उभे केले आहे.
काेकणात गणेशाेत्सवात माेठ्या प्रमाणात साजरा केला जाताे. गणेशाेत्सवाच्या काळात विविध विषयांवर चलचित्र तयार करण्याची स्पर्धा रंगलेली असते. समाजप्रबाेधन करणारे देखावे साकारून त्यातून जनजागृती करण्यात येते. या चलचित्रांसाठी विशेष प्रकार गणेश स्पर्धाही आयाेजित केल्या जातात. ही चलचित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही हाेत असते. मात्र, गतवर्षीपासून काेराेना विषाणूचा शिरकाव झाला आणि गणेशाेत्सवार काही निर्बंध घालण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी गणेशाेत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत, अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या वर्षीही साधेपणानेच उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला आहे.
काेराेनाचे संक्रमण वाढत असले, तरी आजही अनेक जण नियमांचे पालन न करताच फिरताच बाहेर पडत आहेत. अशा वेळी काेराेनाची लागण झाल्यास त्या माणसाला आपला प्राणही गमवावा लागताे. काेराेनाबाबत जनजागृती करण्यासाठी मिरजाेळे-पाडावेवाडी येथील श्रीकांत पाडावे व त्यांच्या कुटुंबाने चलचित्र साकारला आहे. या चलचित्रात विनाकारण बाहेर पडणाऱ्या माणसाला पाेलीस पकडतात. पकडल्यानंतर ताे न पटणारी कारणे देताे आणि मग यमाच्या तावडीत सापडताे, असे दाखविण्यात आले आहे. या देखाव्यात नियम पाळा, लस घ्या, गर्दी करू नका, अशा नियमांसह डॉक्टर्स, सामान्य माणूस आणि यमदेव यांच्यातील संवादही दाखविला गेला आहे.
--------------------------
पर्यावरणपूरक सजावट
मागील २५ वर्षांपासून पाडावे कुटुंब विविध प्रकारचे देखावे साकारत आहेत. या देखाव्यासाठी त्यांनी पुठ्ठा आणि कागदाचा वापर केला आहे. त्यातून त्यांनी पर्यावरणाचाही संदेश दिला आहे. गेले महिनाभर हा देखावा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले हाेते. या देखाव्यातून काेराेनामुक्तीचा संदेश देण्यात आला आहे.