नाशिक : रमजानचे यावर्षी तीस उपवास पूर्ण झाले असून मुस्लीम बांधवांचा आनंद द्विगुणित झाला आहे. ईदनिमित्त गुरुवारी (दि. ७) सकाळी दहा वाजता विशेष नमाजपठण शहाजहांनी इदगाहवर करण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्या व राज्यात आज रमजान ईद साजरी होणार आहे.दरम्यान, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदच्या नमाजपठणाला इदगाहवर प्रारंभ केला जाणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता इदगाहवर महापालिकेने काही अंतरापर्यंत पत्र्याचे शेडही उभारले आहे. तसेच बुधवारी पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्यामुळे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर मैदानाचे सपाटीकरण पूर्ण केले. रविवारी (दि. ३) झालेल्या संततधारेने मैदानावर पाणी साचून खड्डे पडले होते. त्यामुळे मैदानाच्या सपाटीकरणाचे काम खोळंबले होते; मात्र पावसाची मिळालेली उघडीप आणि ईद एक दिवस उशिरा साजरी होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही वेळ मिळाला आणि मैदानाचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले. ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी मुरूम टाकून रोलर फिरविण्याचे काम दिवसभर सुरू होते. दुपारी तीन वाजता हिसामुद्दीन खतीब, हाजी मीर मुख्तार अशरफी, नगरसेवक सुफी जीन, हाजी शोएब मेमन यांनी पाहणी करत तयारीचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)
चुकीच्या पध्दतीने शिक्षक अतिरिक्त
By admin | Updated: July 7, 2016 00:28 IST