चिपळूण : सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे यात काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबले आहेे. मध्यंतरी लाॅकडाऊन संपल्यानंतर हे कामगार पुन्हा परतले होते. मात्र, आता पुन्हा तीच परिस्थिती आल्याने काही कामगारांनी आपल्या गावी परतण्यास सुरूवात केली आहे. मात्र, काही कामगार अजूनही लाॅकडाऊन संपेल आणि आपले काम सुरू होईल, या आशेवर आहेत.
हाॅटेलचालकांचे नुकसान
गुहागर : येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचबरोबर लाॅकडाऊन काळात घरपोच सेवा आणि पार्सल वगळता हाॅटेल्स, रेस्टाॅरंट यांनाही सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभर या व्यवसायाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने या व्यवसायाला माेठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन पर्यटन काळात या व्यवसायाला लाॅकडाऊनचा फटका बसला आहे.
गाळ उपसा सुरू
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपानजिक असलेल्या देवडे गावातील काज़ळी नदी गाळ उपसा प्रकल्पाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र १ किलोमीटर लांब, ८० मीटर रूंद, दोन मीटर खोल करण्यात आले आहे. हे काम नाम फाऊंडेशनने दिलेल्या पोकलेन यंत्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. गाळ उपसा होणार असल्याने या नदीचे पात्र मोकळे होणार आहे.
कडक लाॅकडाऊन
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे गावाने दिनांक १८ ते २६ एप्रिल या सात दिवसांच्या कालावधीत कडक लाॅकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवा आणि दवाखाने वगळता कुठलीही दुकाने सुरू ठेवण्यात आलेली नाहीत.
खेळही थांबले
देवरूख : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणेही बंद आहेत. त्यामुळे आता मोकळ्या मैदानांवर सुरू असलेल्या खेळांवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे मोकळ्या मैदानावर रंगणारे क्रिकेटचे सामने आता थांबले आहेत.
उद्याने शांतच
रत्नागिरी : उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांना किती खेळावे आणि किती नको, असे होते. मात्र, या सुटीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सार्वजनिक ठिकाणेही बंद आहेत. त्यामुळे बालकांचे खेळण्याचे हक्काचे ठिकाण बंद झाले आहे. त्यामुळे उद्यानातही आता शांतता पसरलेली दिसत आहे.
उंदरांचा वावर
राजापूर : तालुक्याला मिळणाऱ्या धान्याचा साठा करून ठेवणाऱ्या पंचायत समितीच्या गोदामाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरूस्ती न झाल्याने ही इमारत अधिकच जीर्ण झाली आहे. सध्या या गोदामात उंदीर आणि घुशींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही इमारत सध्या धोकादायक झाली आहे.
मच्छरांचा त्रास
रत्नागिरी : शहर तसेच परिसरात यावर्षी मच्छर प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या सर्व शहरवासीयांना मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सायंकाळी हे मच्छर घरात घुसत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पाण्याची टंचाई
रत्नागिरी : शहरातील जेल नाका येथील काही भागात सध्या पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काही भागात अधूनमधून पाणी येते. पाणीपुरवठ्यात सातत्य नसल्याने या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. नगर परिषदेने पाणी पुरवठा ठराविक वेळेत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतीची कामे रखडली
लांजा : गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळापूर्व कामांना प्रारंभ करण्यापूर्वीच कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केल्याने लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मशागतीची, भाजावळीची कामे आता थांबली आहेत. बळीराजा लाॅकडाऊन कधी संपणार, याची प्रतीक्षा करत आहे.