सुभाष कदम ल्ल चिपळूण मंगल सोहळ्यासाठी घर गजबजलं. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने दोन जीव व दोन कुटुंब एकत्र येण्याचा सोहळा अवघ्या काही तासांवर आला. घराची रंगरंगोटी झाली. घरासमोर आकर्षक मंडप सजला. केळीचा खांब उभा राहिला. परंतु, अचानक आलेल्या वादळी पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले. लग्नाच्या मंडपासह घराचे छप्परही पतंगासारखे उडवून नेले आणि विवाह सोहळ्यात विरस पडला. त्यावरही मात करून ग्रामस्थ आणि सार्या वºहाडी मंडळींनी नव्याने मांडव घातला आणि विवाह सोहळा पार पडला. चिपळूण तालुक्यातील भोम खालचीवाडी येथील मनोहर चव्हाण यांची मुलगी भाग्यश्री हिचा कापरे देऊळवाडी येथील सुमित सतीश मोरे यांच्याबरोबर आज गुरुवारी १२.३५ वाजता विवाह झाला. मात्र या लग्नापूर्वीचे काही तास चव्हाण कुटुंबियांच्या हृदयाचे ठोके चुकविणारे ठरले. बुधवारी अचानक झालेल्या वादळात मनोहर चव्हाण यांच्या घराचे सिमेंटच्या पत्र्याचे छप्पर लोखंडी पाईपसह उडून गेले. घरासमोर लग्नासाठी घातलेला मंडप, त्याचे लोखंडी पाईप वाकून संपूर्ण कापड फाटले. मंडपच उडून गेल्याने सर्वांची तारांबळ उडाली. मात्र आज सकाळपासून चव्हाण कुटुंबियांनी कंबर कसली. आप्तस्वकीय व ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा नव्याने मंडप घातला. धीर खचू न देता विवाहसोहळा थाटात पार पडला.
वादळाच्या अडथळ्यानंतरही कार्य सिद्धीस गेले! भोम गावची कथा : उद्ध्वस्त झालेला मंडप वºहाडी आणि ग्रामस्थांनी केला उभा
By admin | Updated: May 9, 2014 00:22 IST