अनिल कासारे/लांजा : लांजा पंचायत समिती सुसज्ज नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी सर्व प्रशासकीय मान्यता मिळाली असतानाही गेल्या आठ महिन्यांपासून पंचायत समितीच्या कार्यालय स्थलांतरित करण्यास सत्ताधारी व अधिकारी यांनी कोणतीच हालचाल न केल्याने इमारत बांधकामाचे घोंगडे भिजत पडले आहे.
लांजा पंचायत समितीची इमारत धोकादायक झालेली आहे. इमारतमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. तीन ते चार वर्षांपूर्वी इमारतीची डागडुजी करण्यात आली होती. पंचायत समिती सुसज्ज इमारत बांधकाम करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता देण्यात आली. पंचायत समितीची दोन मजली सुसज्ज इमारत बांधकामासाठी ३ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी कामाची निविदा प्रक्रिया फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडली. त्या कामाचा कार्यारंभ आदेश १ मार्च २०२१ ला देण्यात आला असून, सहा महिने उलटूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.
पंचायत समितीच्या कामाला मंजुरी मिळून आठ महिने झाले तरी पंचायत समिती कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्यात चालढकल केल्याने इमारत बांधकाम रखडले आहे.
पंचायत समितीची सुसज्ज अशी दोन मजली इमारत बांधण्यासाठी ठेकेदार याला एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. या कामाचा मक्ता राधानगरी कोल्हापूर तेथील अभय तेंडुलकर यांना देण्यात आला आहे. एका वर्षातील सहा महिन्याचा कालावधी कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी गेल्याने पुढील सहा महिन्याच्या कालावधीत तरी इमारतीचे बांधकाम होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----------------------
सुस्त कारभार
आमदार राजन साळवी यांच्या विशेष प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधकाम व दुरुस्ती या योजनेतून ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला; परंतु पंचायत समितीच्या पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या सुस्तपणामुळे हा निधी अद्याप पडूनच आहे.
----------------------
पंचायत समिती स्थलांतर करण्याचे काम आमचे नव्हे. ज्या दिवशी कार्यालय स्थलांतरित केले जाईल. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करण्यात येईल.
- संजय आडकर, उपअभियंता, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
-----------------------
कार्यालय स्थलांतरित करण्याचा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. कारण पंचायत समितीचे सर्वच खाती एकाच ठिकाणी असावीत, यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे. असे असले तरी अधिक विलंब होऊ नये म्हणून यावर लवकरच मार्ग काढून नवीन इमारतीचे बांधकामाला लवकरच सुुरुवात करू.
-
मानसी आंबेकर,
सभापती, पंचायत समिती, लांजा.