चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने जाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेची दोन दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार तिला जिल्हा विशेष कारागृहात पाठविण्यात आले.
अजित वसंत साळवी यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभी केली होती. मात्र, मध्यरात्रीनंतर ही वाहने जाळण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांना जवळच असलेल्या बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला गाड्या जाळत असल्याचे दिसले. त्याची खातरजमा करून उत्तरा वसंत शिंदे (रा. मोरवणे) हिला अटक करण्यात आली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
वैयवित्तक आकसातून हा प्रकार घडल्याचे समजते. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर, सहायक पोलीस फौजदार नामदेव जाधव अधिक तपास करीत आहेत.