राजापूर : तालुक्यातील नाटे येथे बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास नाटे पोलीस स्थानकालगत झालेल्या दुचाकी अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी महिलेला संदेश पाथरे यांच्या रुग्णवाहिकेतून धारतळे प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
खड्डे खोदण्याचे काम करणारे ठेकेदार बाजीराव हे दुचाकीवरून जात असताना नाटे येथे दुचाकीवर मागे बसलेली महिला अचानक रस्त्यावर पडली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. महिला पडल्यामुळे चालकाचा तोल जाऊन दुचाकीही थोडी पुढे जाऊन पडली. सुदैवाने पाथरे कार वॉशचे मालक संदेश पाथरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ मदत केली. स्वत:च्या रुग्णवाहिकेमधून त्यांचे चिरंजीव दादू पाथरे यांनी जखमी महिलेला उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविले. धारतळे ते नाटे या मुख्य रस्त्यावर अर्धवट काम झालेले असताना मधला काही भाग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.