रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसुल करणाऱ्या खासगी बसवाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन विभागाने याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत.
श्रमदानाने एस. टी. सेवा सुरू
दापोली : ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे होत असलेल्या रस्त्याची दुरवस्था व देखभाल दुरूस्तीकडे होत असलेले बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. कळकी नाचरेवाडी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांनी श्रमदानातून खड्डे बुजवून रस्ता दुरूस्ती करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाढलेली झाडी तोडली.
शाळेचे नूतनीकरण सुरू
दापोली : तालुक्यातील मुर्डी येथे सुरु केलेल्या सक्तीचे शिक्षण हा पायंडा पाडणाऱ्या शाळेचे नूतनीकरण वेगाने सुरू आहे. पुण्यातील सह्याद्री फाउंडेशनने या कामाचा आर्थिक खर्च उचलून सामाजिक बांधिलकी जपली आहे. बांधकाम प्रगतीपथावर असून इमारतीत दोन वर्गखोल्या, कार्यालय वरच्या मजल्यावर वाचनालय होणार आहे.
रुद्रानुष्टानची सांगता
रत्नागिरी : येथील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील तृणबिंदूकेश्वरावर श्रावणात सलग एक महिना संततधार रुद्रानुष्ठान सुरू होते. भाद्रपद प्रतिपदेला या संततधार रुद्रानुष्टानची सांगता झाली. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करत श्री ग्राम भैरी देवस्थान ट्रस्टचे बारा वाड्यांचे ग्रामस्थ, मानकरी यांच्या सहकार्याने रुद्रानुष्ठान यशस्वी झाले.
सामाजिक संस्थांना मदत
रत्नागिरी : येथील आसमंत बेनओलन्स फाउंडेशन या संस्थेतर्फे दोन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. पुणे येथे कोंढवा येथील स्वामी विवेकानंद उद्यानाजवळ आनंद वृद्धाश्रम (पुणे, कोकण) या संस्थेचा एक महिन्याचा जेवणाचा पूर्ण खर्च आसमंतने उचलला आहे. आबासाहेब नांदुरकर प्रतिष्ठानच्या आधारवड (भोर) या संस्थेला ५० हजार रुपयांची वस्तुरूप मदत देण्यात आली.
झाडी तोडण्याची मागणी
रत्नागिरी : रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी वाढल्याने समोरचे वाहन दिसत नसल्याने अपघाताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने झाडी तोडण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.